क्रांतीसूर्य महात्मा फुले यांनी देशात स्वातंत्र्य, समता व बंधुतेची बीजे रोवली – छगन भुजबळ

0
नाशिक : आद्यसमाज सुधारक क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांची आज १९५ वी जयंती सर्वत्र साजरी होत आहे. त्यानिमित्ताने येवला येथील महात्मा फुले नाट्यगृह येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास अन्न आणि नागरी पुवठा मंत्री छगन भुजबळ याची पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले. यावेळी तहसीलदार प्रमोद हिले, मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, ज्येष्ठ नेते आंबदास बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, मायावती पगारे, येवला बाजार समिती प्रशासक सभापती वसंत पवार, नगरसेवक दिपक लोणारी, अडतीसगाव पाणी पुरवठा योजनेचे अध्यक्ष सचिन कळमकर, संतोष खैरनार, सुभाष गांगुर्डे, भाऊसाहेब धनवटे, गोटू मांजरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी भुजबळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आद्यसमाज सुधारक, सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा जोतीराव फुले यांनी बहुजन समाजाला ज्ञानाचा प्रकाश दाखवून वैचारिक गुलामगिरीतून मुक्त केलं. स्वातंत्र्य, समता व बंधुतेची बीजे रोवत देशात सामाजिक क्रांती घडवून आणली. महात्मा फुले यांनी स्त्रियांना शिक्षणाची दारं खुली करुन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणलं. देशात अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी-परंपरांवर हल्ला करुन प्रबोधनाची चळवळ उभारली. शेतकरी, कष्टकरी, महिला व उपेक्षित बांधवांना हक्कांची जाणीव करुन देत लढण्याचं बळ दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून शिवजयंती उत्सवाची सुरुवात केली. देशाला पुढे नेणारा, सामाजिक क्रांती घडवणारा विज्ञानवादी, सत्यशोधक विचार त्यांनी दिला.
समाजातील पिडीत आणि वंचित घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महात्मा फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. देशात स्वातंत्र, समता व बंधुता याचे बीज समाजात रोवले. त्यामुळे देशात मोठी सामाजिक क्रांती झाली. त्यांचे विचार अविरत रुजविण्याचा निर्धार त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण करूया. महात्मा फुले यांच्या प्रगत, पुरोगामी, सत्यशोधक विचारांवर महाराष्ट्राची वाटचाल सुरु असून ती अविरत सुरू राहील. या देशाला एकसंघ ठेवण्यात त्यांचे विचार अतिशय उपयोगी असल्याचे भुजबळ म्हणाले.
Leave a comment