कसबा पोटनिवडणूक आपण सर्वच कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन जिंकायची आहे – चंद्रकांत पाटील

0
पुणे : कसबा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने भाजपा पुणे शहराची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महाबैठक झाली. या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. कसबा पोटनिवडणूक आपण सर्वच कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन जिंकायची आहे. मी स्वतः पक्षाचा कार्यकर्ता म्हणूनच फिरायला सुरुवात केली आहे. सर्व कार्यकर्त्यांनीही कामाला लागावं, अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांसमोर मांडली.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, कसबा पोटनिवडणुकीसाठी पक्षानं तीन समित्या स्थापन केल्या आहेत. त्यातील राजकीय समितीचं प्रमुखपद आ. माधुरीताई मिसाळ यांच्याकडे आहे. संजयनाना काकडे त्यांना सहाय्यक म्हणून काम पाहतील. त्यासोबतच संघटनात्मक कामांसाठी राजेश पांडे यांच्या नेतृत्वात समिती स्थापन करण्यात आली असून राजेश येनपुरे त्यांना मदत करतील. तर व्यवस्थापन समिती कसबा‌‌ मंडल अध्यक्ष प्रमोद कोंढरे यांच्या नेतृत्वात काम करेल.‌
चंद्रकांत पाटील यांनी पुढे म्हटले कि, महाराष्ट्रात भाजपाचे ४० असे मतदारसंघ आहेत, जिथे कोणतीही राजकीय समीकरणं तयार झाली, तरी विजय भाजपाचाच होतो. कसबा विधानसभा मतदारसंघ हा त्यापैकीच एक आहे. आपल्याला असे शंभर मतदारसंघ तयार करायचे आहेत‌. त्यामुळे मुक्ताताईंच्या निधनाने रिक्त झालेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करायचं आहे, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं.
कसबा पोटनिवडणुकीसाठी मी स्वतः कार्यकर्ता म्हणून काम करणार असून, निवडणुकीच्या अनुषंगाने किमान शंभर घरांना भेट देणार आहे. त्यासाठी मी माझ्या वेळापत्रकातही आवश्यक बदल केलेला आहे. कार्यकर्त्यांनीही आपापल्या कामाचं सुयोग्य नियोजन करावं, अशी भूमिका पाटील यांनी मांडली. या पोटनिवडणुकीत माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या साथीनं भाजपालाच विजयी करू, यात शंकाच नाही, असे मत यावेळी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
Leave a comment