कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा महाराष्ट्रात शिरकाव ; पुण्यात आढळले ७ रुग्ण

पुणे :- महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून, राज्य सरकार आणि आरोग्य यंत्रणांच्या चिंतेत भर पाडणारा अहवाल आता समोर आला आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट बीए ४ आणि बीए ५ चे एकूण सात रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यात हे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा अलर्टवर आहेत.राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
महाराष्ट्रात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या रुग्णांचं निदान झालं आहे. पुण्यात ओमायक्रॉनच्या २ नव्या सब व्हेरिएंट म्हणजेच बीए ४ चे ४ तर बीए ५ चे ३ रुग्ण आढळून आले आहेत. चिंताजनक बाब म्हणजे हे व्हेरियंट जास्त संसर्गजन्य असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलंय. त्यामुळे नागरिकांनी आता आणखी काळजी घेण्याची गरज आहे. या ७ पैकी २ दोघे हे आफ्रिका आणि बेल्जिअम येथे प्रवासाची माहिती आहे. तसेच, तिघे हे कर्नाटका आणि केरळातून आल्याची माहिती आहे. तर, इतर दोघे यांनी कुठेही प्रवास केल्याची नोंद नाहीये.
दरम्यान, कोरोना रुग्णसंख्या वाढत असून, राज्य सरकारनंही चिंता व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मास्क घालण्याचे आवाहन राज्यातील जनतेला केलं होतं. तर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही जालन्यात बोलताना, मास्क सक्तीबाबत विचार करण्याबाबत सूचक विधान केले होते. त्याचवेळी राज्याच्या आरोग्य विभागाने आज, शनिवारी गेल्या २४ तासांतील कोरोना अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार, राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५२९ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ३२५ रुग्ण बरे झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. याच कालावधीत शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.
For the first time, B.A. 4 & 5 variants have been found in Maharashtra; 4 patients of B.A. 4 variants & 3 patients of B.A. 5 variants in Pune, as per the latest report of the Whole Genomic Sequencing.
— ANI (@ANI) May 28, 2022