1 फेब्रुवारीपासून पुण्यातील शाळा आणि महाविद्यालये सुरु होणार ; उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती

0

पुणे :- राज्यात 23 जानेवारीपासून शाळा सुरु झाल्या आहेत. कोरोनाची परिस्थिती पाहता राज्य सरकारने शाळांबाबतचा निर्णय जिल्हा आणि स्थानिक प्रशासनाकडे सोपवला होता. त्यानुसार काही जिल्ह्यांमध्ये सोमवारपासून शाळा सुरुही झाल्या. मात्र, पुण्यातील शाळा अद्याप बंदच आहेत. मात्र आता पुण्यातील शाळा आणि महाविद्यालये 1 फेब्रुवारीपासून सुरु होणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

पुण्यातील कोरोना परिस्थिती आढावा घेऊन शाळांबाबत निर्णय घेऊ अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली होती. त्यानंतर आता पुण्यातील शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. अजित पवार यांनी सांगितले की, ”शाळा जरी सुरु होत असल्या तरी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणे बंधनकारक नसेल. पालकांनी याबाबत निर्णय घ्यायचा आहे. एकदा घडी नीट बसली की मग याबाबत पुढचा निर्णय घेण्यात येईल. पहिली ते आठवी वर्गाची शाळा अर्धा दिवस असेल. दुपारच्या सुट्टीनंतर मुलांनी घरी जाऊन डबा खायचा आहे. तर, नववी इयत्तेपासून पुढच्या इयत्तांचे वर्ग पूर्णवेळ भरतील.

राज्य सरकारच्या निर्णयानुसार राज्यभरात २३ जानेवारीपासून शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. बालवाडी ते इयत्ता बारावी पर्यंतच्या शाळा आजपासून सुरु झाल्या आहेत. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन राज्य सरकारने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु पुन्हा रुग्ण संख्या काही ठिकाणी कमी होऊ लागल्याने शाळा पुन्हा सुरु कराव्यात अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे पुन्हा शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाला देण्यात आला आहे.

Leave a comment