पाठयपुस्तकात २६ /११ च्या शौर्य गाथेचा समावेश व्हावा यासाठी पाठपुरावा करू – चंद्रकांत पाटील

0

पुणे : पुण्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी २६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.   २६/११ च्या हल्ल्यातील दहशतवाद्यांशी लढताना वीर पोलिसांनी आणि जवानांनी दिलेल्या बलिदानाची माहिती नव्या पिढीला व्हावी यासाठी पाठ्यपुस्तकात त्याचा समावेश करण्यासाठी पाठपुरावा करू, असं आश्वासन त्यांनी यावेळी  पोलीस मित्र संघटनेला दिले.

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटले कि, २६ / ११  चा हल्ला हा शब्द जरी आपण ऐकला तर त्यावेळच्या टीव्हीवरील सगळ्या बातम्या आपल्या डोळ्यासमोर येतात. हा एक भ्याड हल्ला होता. निष्पाप लोकांची हत्या करायची, एक दहशत निर्माण करायची, भारताची आर्थिक राजधानी मुंबई एका अर्थाने अस्थिर करायची, याचा  संपूर्ण देशात निषेध करण्यात आला.

या हल्ल्यात आपले शूर जवान शाहिद झाले. मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. हा इतिहास मग तो स्वातंत्र्याचा असेल, युद्धाचा असेल, २६ /११ च्या हल्ल्याचा असेल, पुण्यातल्या जर्मन बेकरीचा विषय असेल, हे सगळं तरुण पिढीसमोर व्यवस्थित आलं पाहिजे.  त्यांना असं वाटत असतं  कि आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, आणि ते स्वातंत्र्य आपण टिकवतोय. ते सहजासहजी मिळालंय आणि सहजासहजी टिकवतोय असं  त्यांना वाटत आहे, असे पाटील यांनी म्हटले.

२६ / ११ चा हल्ला आणि त्यामध्ये आपल्या जवानांनी केलेला संघर्ष , त्यांचं हौतात्म्य हे सगळ्यांसमोर येण्यासाठी शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणामध्ये यावर धडा यावा अशी मागणी आलेली आहे. हे खातं दीपक केसरकर आणि माझ्याकडे आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या   निदर्शनास आणू देतो कि हे आम्ही करत आहोत. नजीकच्या काळात हे आम्ही नक्की करू असा मी शब्द देतो असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

यावेळी पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल, पोलीस मित्र संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र कपोते, सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण जाधव, मिलिंद चौधरी, पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर उपस्थित होते.

Leave a comment