१८ वर्षांवरील वयोगटाला उद्यापासून मिळणार बूस्टर डोस ; केंद्र सरकारचा निर्णय

0

मुंबई :-  कोरोना महामारीविरोधातील लढाई आणखीन मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने  एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता १८ वर्षांवरील सर्वांना कोरोनाचा बूस्टर डोस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानुसार १० एप्रिलपासून १८ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील लोकाना बूस्टर डोस मिळेल.

१० एप्रिलपासून १८ वर्षांवरील लोकं खासगी केंद्रात बूस्टर डोस घेऊ शकतात. महत्त्वाचे म्हणजे दुसऱ्या डोस घेऊन ज्यांना ९ महिने पूर्ण झाले आहेत, ते बूस्टर डोससाठी पात्र असणार आहे, याबाबतची सविस्तर माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवियांनी दिली आहे. देशातील नागरिकांना लसीकरणाचे सुरक्षा कवच पूर्णपणे देण्यासाठी सरकार वेगाने लसीकरण करत आहे. सरकारने आता आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि ६० वर्षांवरील लोकांसाठी जे बूस्टर डोस दिले जात आहे, ते देखील वेगाने करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आता रविवार, १० एप्रिलपासून १८ वर्षांवरील सर्व लोकांना बूस्टर डोस दिला जाणार आहे.

देशात सर्व १५ वर्षांवरील लोकसंख्येतील जवळपास ९६ टक्के लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर १५ वर्षांवरील ८३ टक्के लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि ६० वर्षांवरील २.४ कोटींहून अधिक जणांना बूस्टर डोस देण्यात आला आहे. या अगोदर केवळ आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांनाच बूस्टर डोस दिला जात होता. त्यामुळे सर्वसामान्यांना बूस्टर डोस कधी मिळणार याची प्रतिक्षा आता  संपली आहे.

Leave a comment