६ ते १२ वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा ; कोव्हॅक्सिन या लसीला डीसीजीआयकडून आपतकालीन वापरासाठी परवानगी

0

दिल्ली :- देशभरात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढले आहे. देशात कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध भागात कोरोनाचा संसर्ग वाढत असून, रुग्णसंख्या वाढली आहे. त्यामुळे लसीकरणावर भर दिला जात असून, ६ ते १२ वयोगटातील लहान मुलांनाही लवकरच कोरोनापासून संरक्षण मिळणार आहे.  ६ ते १२ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या लसीच्या आपतकालीन वापराला परवानगी दिली आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढत असून, लहान मुलांना पटकन संसर्ग होताना दिसत आहे. कोरोनाच्या एक्सई व्हेरियंटचा लहान मुलांवर परिणाम होत असल्याचंही आढळून आलं आहे. त्यामुळे चिंता केली जात असतानाच आता ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) कोव्हॅक्सिन लसीचा ६ ते १२ वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी परवानगी दिली आहे. त्याबरोबर ५ ते १२ वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने कोर्बोव्हॅक्स आपतकालीन वापराला परवानगी दिली असल्याची माहिती एएनआय वृत्तसंस्थेनं सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

मार्च महिन्याच्या सुरुवातीला 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांना कोविड लसीकरण करण्यात आले होते. आता DCGI ने 6 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांना कोव्हॅक्सिन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांवर फारसा परिणाम झाला नाही, परंतु आता लहान मुले देखील कोरोनाचा नवीन प्रकार XE च्या कचाट्यात सापडत आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर या प्रकरणांमध्ये वाढ होण्याची भीती आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, गेल्या तीन आठवड्यांत मुलांमध्ये फ्लूसारखी लक्षणे वाढली आहेत. त्याचवेळी, मंजुरी मिळाल्यानंतर, सरकार लवकरच एक मार्गदर्शक तत्त्व जारी करणार असल्याचं बोललं जातंय.

Leave a comment