किडनी तस्करीप्रकरणी पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकच्या १५ डॉक्टरांवर गुन्हा दाखल

0

पुणे: पुण्यातील किडनी तस्करी प्रकरणाने खळबळ उडाली आहे. नामांकित रूबी हॉल क्लिनिकचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. परवेज ग्रँट, कायदेशीर सल्लागार मंजूषा कुलकर्णी यांच्यासह १५ जणांवर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फसवणूक आणि मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १५ लाख रुपयांच्या आमिषाने एका महिलेचे किडनी प्रत्यारोपण केल्याचा प्रकार मार्चमध्ये उघड झाला होता. याप्रकरणात राज्य आरोग्य विभागाने रुग्णालयाच्या अवयव प्रत्यारोपण केंद्राचा परवाना निलंबित केला आहे.

व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. परवेज ग्रँट, उपसंचालक रेबेका जॉन, कायदेशीर सल्लागारमंजूषा कुलकर्णी तसेच डॉ. अभय सद्रे, डॉ. मुफ्त भाटी, डॉ. हिमेश गांधी, सुरेखा जोशी यांच्यासह अमित साळुंखे, सुजाता साळुंखे, सारिका सुतार, अण्णा साळुंखे, शंकर पाटील, सुनंदा पाटील, रवी गायकवाड, अभिजित मदने यांच़्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत आरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक डॉ. संजोग कदम यांनी फिर्याद दिली आहे.

१५ लाखांचे आमिष देत फसवणूक

अमित साळुंखे या रुग्णाने सारिका सुतार या महिलेला पंधरा लाख रुपयांचे आमिष दाखवून रूबी हॉलमध्ये किडनी प्रत्यारोपण केले. साळुंखे याने सादर केलेली कागदपत्रे ग्राह्य धरून प्रत्यारोपण समितीने किडनी प्रत्यारोपणास परवानगी दिली. १५ लाख रुपये मिळाले नाही म्हणून सुतार यांनी फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली. त्यानंतर किडनी तस्करीचा प्रकार उघड झाला होता. पैशांसाठी किडनी विकलेल्या महिलेलाही आरोपी करण्यात आले आहे.

Leave a comment