बहुचर्चित सरसेनापती हंबीरराव या चित्रपट धमाकेदार ट्रेलर रिलीज ; ‘या’ दिवशी येणार चित्रपटगृहात

0

मुंबई :- छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे यांच्या बहुचर्चित सरसेनापती हंबीरराव या चित्रपट धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. सध्या हा चित्रपट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता प्रविण विठ्ठल तरडे यांनी या चित्रपटामध्ये सरसेनापती हंबीरराव मोहितेंची मुख्य भूमिका साकारली असून चित्रपटातील सरसेनापती हंबीरराव मोहितेंच्या पत्नीची भूमिका प्रविण तरडेंची पत्नी स्नेहल तरडे यांनी साकारली आहे.

चित्रपटाच्या घोषणेपासूनच जगभरातील शिवशंभूप्रेमींच्या मनामध्ये या चित्रपटाची उत्कंठा निर्माण झाली होती, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या अंगावर रोमांच उभे करणाऱ्या “हंबीर तू…” या गाण्याने ती अजून वाढली तर आता “सरसेनापती हंबीरराव” च्या या जबरदस्त ट्रेलरमुळे ही उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. “परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट”… “युद्धात झालेल्या जखमे इतका देखणा दागिना नाही, फक्त तो दागिना छातीवर पाहिजे” असे जबरदस्त संवाद आणि धमाकेदार ऍक्शन सिक्वेन्स असलेल्या या ट्रेलरमध्ये सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन छत्रपतींच्या काळात स्वराज्यासाठी गाजवलेल्या अतुलनीय शौर्याची झलक पाहायला मिळत आहे.

छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका गश्मीर महाजनी साकारणार असल्याचे स्पष्ट झाले आहे, या आधी छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिकासुद्धा गश्मीर साकारणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे त्याला दोनही छत्रपतींच्या भूमिकेत बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. संदीप मोहितेपाटील प्रस्तुत, उर्वीता प्रॉडक्शन्सच्या शेखर मोहितेपाटील, सौजन्य निकम, धर्मेंद्र बोरा यांची निर्मिती असलेल्या ‘सरसेनापती हंबीरराव’ हा महाराष्ट्राचा महासिनेमा येत्या काही दिवसातच म्हणजेच 27 मे 2022 रोजी संपूर्ण महाराष्ट्रासह जगभरातील शिवशंभूप्रेमींच्या भेटीला मोठ्या पडद्यावर येत आहे.

 

Leave a comment