ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचं निधन

0

मराठी – हिंदी मनोरंजन सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचे आज निधन झाले. वयाच्या ७५ व्या  वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.अनेक लोकप्रिय चित्रपट आणि मालिकांमध्ये त्यांनी दमदार भूमिका बजावल्या आहेत. वास्तव, सरफरोश या सिनेमांमध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिकाबजावली होती.  त्यांच्या अभिनयाने त्यांनी स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली होती.

सुनील शेंडे यांचे राहत्या घरी निधन झाले आहे. त्यांना अचानक चक्कर आली आणि ते चक्कर येऊन पडले. त्यांच्या शरीरात अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने त्यांचे निधन झाले असल्याची माहिती मिळाली आहे.  विलेपार्ले येथील राहत्या घरी त्यांचे रात्री एक वाजता निधन झाले. आज दुपारी एक वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
निवडुंग, मधुचंद्राची रात्र, जसा बाप तशी पोर, ईश्वर,यासारख्या गाजलेल्या चित्रपटात त्यांनी भूमिका बजवाल्या आहेत. मराठीसोबतच हिंदी चित्रपट सृष्टीत त्यांनी वेगळी अशी स्वतःची ओळख निर्माण केली. राजकारणी भूमिका त्यांनी अधिक केल्या. रुबाबदार व्यक्तिमत्व आणि खडा आवाज यामुळे त्यांनी पोलिसी भूमिका देखील अधिक निभावल्या. त्यांच्या जाण्याने अनेक कलाकारांना धक्का बसला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुनिल शेंडे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनीं म्हटले आहे कि, मराठी नाटक,मालिका व चित्रपट क्षेत्रात आपल्या चतुरस्त्र अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांच्या निधनाने मराठी चित्रपट क्षेत्राची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे.त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही प्रार्थना.भावपूर्ण श्रद्धांजली

Leave a comment