राज्यात आज ओमायक्रॉन व्हेरिएंटचे 6 नवे रुग्ण

0

मुंबई : संपूर्ण जगाची धास्ती वाढवलेल्या कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटच्या रुग्णाची संख्या महाराष्ट्रात दररोज वाढत चालली आहे. आज राज्यात पुन्हा 6 नवे रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे राज्यातील ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या आता 54 वर पोहोचली आहे. आज आढळलेल्या रुग्णापैकी चार रुग्ण मुंबई विमानतळावर घेतलेल्या चाचणीत आढळले आहेत. तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील रुग्णाचा समावेश आहे. विशेष म्हणजे मुंबईत आढळलेल्या चारही रुग्णाचे लसीकरण झालं आहे. यामुळे महाराष्ट्राच्या चिंतेत वाढ झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये 4 रुग्ण तर पुण्यात 1 आणि पिंपरी चिंचवडमध्ये 1 रुग्ण आढळून आला आहे. मुंबई विमानतळावर तपासणी करण्यात आली होती, त्यातील 4 रुग्ण आढळले आहे. मुंबईत आढळून आलेल्या चार रुग्णांपैकी १ रुग्ण हा मुंबईतला आहे. तर २ रुग्ण हे कर्नाटक राज्यातील आहे. तर एक रुग्ण औरंगाबाद येथील रहिवासी आहे. यातील दोन जणांनी टांझानियाचा प्रवास केला असून इतर दोन जणांनी इंग्लंडचा प्रवास केला आहे. या चारही रुग्णांचे पूर्ण लसीकरण झालेले आहे. या सर्वांना मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संपर्कार्कात आलेल्या एका पाच वर्षीय मुलामध्ये ओमायक्रॉन विषाणूची बाधा झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. या रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणं आढळून आलेली नाहीत. तर पिंपरी चिंचवडमध्ये एका 46 वर्षीय व्यक्तीला ओमायक्रॉनची लागण झाली आहे. या रुग्णामध्ये सौम्य लक्षणं आहेत. या रुग्णाचे लसीकरण झालं असून एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

Leave a comment