ठाकरे सरकारचा मोठा निर्णय: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मस्जिदीवरील भोंग्यावरुन आक्रमक भुमिका घेतली आहे. भोंग्यावरुन आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण सुद्धा तापले आहे. मस्जिदीवरील भोंग बंद नाही झाले तर त्यांच्या समोर दुपट्टी आवाजात हनुमान चालीसा लावू असा इशाराच त्यांनी दिला होता. त्यानंतर राज ठाकरे आणि मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांना धमकीचे पत्र आले. या पत्राची भाषा हिंदी-उर्दू अशी मिश्र स्वरुपाची आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच राज यांच्या पोलीस संरक्षणात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज ठाकरे यांच्या सुरक्षेचा दर्जा वाय प्लस आहे. हा दर्जा कायम राहील. पण राज यांच्या सुरक्षेसाठी दोन अतिरिक्त पोलिसांची नियुक्ती केली जाईल. यापैकी एक अधिकारी असेल आणि एक अंमलदार असेल. हा निर्णय महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयाने घेतला.
राज ठाकरे आणि बाळा नांदगावकर या दोघांना धमकीचे पत्र आले. यानंतर बाळा नांदगावकर यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. राज यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी महाराष्ट्र पेटेल अशा स्वरुपाचा इशारा बाळा नांदगावकर यांनी दिला. यानंतर राज्याच्या गृहमंत्रालयाने राज ठाकरे यांच्या संरक्षणात वाढ करत असल्याचे जाहीर केले.