मुंबईतील नाईट लाईफ पुन्हा सुरु; रात्रीची संचारबंदी हटवली

0

मुंबई: राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर निर्बंधांमध्ये हळूहळू शिथिलता देण्यात येत आहे. या साखळीत बीएमसीने मुंबईकरांना दिलासा देण्याच्या निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या निर्देशानुसार महानगर पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मुंबईतील रात्रीची संचारबंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक देखीई जारी करण्यात आले आहे. यामुळे मुंबईकरांची नाईट लाईफ पुन्हा एकदा सुरू होणार आहे.

जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार पर्यटन स्थळे, समुद्र किनारे, गार्डन, पार्क आणि आठवडी बाजार सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मैदानी खेळ 25 टक्के क्षमतेने पर्यंत सुरु ठेवता येणार आहेत. त्याचप्रमाणे स्विमींग पुल आणि वॉटर पार्क देखील 50 टक्के क्षमतेनं सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. दुसरीकडे रेस्टॉरंट, सिनेमागृह आणि नाट्यगृहांना 50 टक्के क्षमतेची मर्यादा घालात सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात येणार आहे. नवीन आदेशात लग्न समारंभात सभागृहाच्या क्षमतेच्या 25 टक्के किंवा 200 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.

सार्वजनिक कार्यक्रमांना देखील काही प्रमाणात निर्बंधांसह परवानगी देण्यात आली आहे. भजन, किर्तन, धार्मिक सोहळे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना 50 टक्के क्षमतेने आयोजनाची परवानगी देण्यात आली आहे. तर खेळांच्या स्पर्धा आणि घोड्यांच्या शर्यतीसह इतर स्पर्धांमध्ये 25 टक्के प्रेक्षकांना उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे.

Leave a comment