महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक वाढतोय ; केंद्राकडून राज्य सरकारला खबरदारी घेण्याच्या सूचना

0

मुंबई :- राज्यात एकीकडे सण, उत्सवांच्या दिवसांची लगबग सुरू असताना महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक वाढताना दिसत आहे. कोरोना रुग्णवाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्य सरकारला पत्र लिहून खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिवांनी महाराष्ट्राच्या आरोग्य सचिवांना पत्र लिहिले आहे.

महाराष्ट्रात मागील एका महिन्यात २ हजार १३५ सरासरी रुग्णसंख्या प्रतिदिवस नोंद होत आहे. नेमका हाच धागा पकडून केंद्राने राज्याला पत्र पाठवले आहे. महाराष्ट्रात आठवड्याला टेस्टचे प्रमाण कोणत्या जिल्ह्यात घटले, सोबतच कोणत्या जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत आहे आणि १० टक्क्यांपेक्षा अधिक पॉझिटिव्हिटी रेट कोणत्या जिल्ह्यात आहे यासंदर्भात केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्याच्या आरोग्य सचिवांना पत्र लिहित माहिती दिली आहे.

राज्यात पुढील काळात येणार्‍या सणांमध्ये गर्दीची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आधीच याबाबत काळजी घेण्याचे आवाहन केंद्राकडून करण्यात आले आहे. रुग्णसंख्या जास्त येत असलेल्या जिल्ह्यांवर नजर ठेवत उपाययोजना करा. पॉझिटिव्हिटी रेट आणि संसर्ग वाढू न देण्यासाठी प्रयत्न करा तसेच केस मॅनेजमेंट करण्याचे आवाहनही केंद्रीय आरोग्य सचिवांनी केले आहे. राज्यात लसीकरणाचा वेग वाढविण्याचेही आवाहन केंद्राकडून करण्यात आले आहे.

Leave a comment