ई-पीक पाहणीचा आढावा घेण्यासाठी वाशिमचे जिल्हाधिकारी पोहचले शेतकऱ्यांच्या बांधावर

0
वाशिम : राज्यात १५ ऑगस्टपासून शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकांची नोंद स्वतः करण्याची सुविधा उपलब्ध करून देणारा ई-पीक पाहणी (E-Peek Pahani) प्रकल्प राबविण्यास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांना ‘ई-पीक पाहणी’ या मोबाईल अॅपद्वारे आपल्या शेतातील पिकांची नोंदणी करण्याविषयी माहिती देऊन त्यांच्याकडून नोंदणी करून घेतली जात आहे. या अनुषंगाने गुरुवारी, २६ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी मालेगाव तालुक्यातील ई-पीक पाहणीविषयक कार्यवाहीचा प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जावून आढावा घेतला. तसेच महसूल व कृषी विभागाला या कामाला गती देण्याच्या सूचना दिल्या.
जिल्ह्यात हे काम गतीने होण्यासाठी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी स्वतः थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ई-पीक पाहणीविषयक कार्यवाहीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच त्यांनी वाशिम तालुक्यातील नागठाणा येथे या अनुषंगाने आढावा घेतला होता. त्यानंतर २६ ऑगस्ट रोजी त्यांनी मालेगाव तालुक्यातील झोडगा, अमानी, करंजी, पांगरी नवघरे व पांगरी धनकुटे या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच ई-पीक पाहणी विषयक कार्यवाहीची माहिती देखील घेतली.
यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी सांगितले की, ई-पीक पाहणी प्रकल्पाच्या कामाला जिल्ह्यात गती देणे आवश्यक आहे. याकरिता तलाठी, कृषि सहायक यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी यांनी या कामाला प्राधान्य द्यावे. येत्या दहा दिवसांमध्ये आपल्याला नेमून दिलेल्या गावातील ई-पीक पाहणीची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच या काळात आपण स्वतः प्रत्येक तालुक्यात जाऊन आढावा घेणार असल्याचे, षण्मुगराजन एस. यांनी सांगितले.
यावेळी सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, तहसीलदार रवी काळे, तालुका कृषि अधिकारी जांभरुणकर यांच्यासह मंडळ अधिकारी, तलाठी व कृषि विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. ‘ई-पाहणी’ मोबाईल अॅपद्वारे शेतकऱ्यांनी स्वतः आपल्या शेतातील पिकांची नोंद करावयाची आहे. त्यानंतर तलाठी या नोंदी तपासून घेतील. याबाबत तलाठी व कृषी सहायक यांच्यामार्फत शेतकऱ्यांना ‘ई-पाहणी’ मोबाईल अॅपची माहिती दिली जात असून त्यांच्याकडून पिकाची नोंदणी करून घेतली जात आहे.
Leave a comment