‘त्या’ वक्तव्यामुळे गुलाबराव पाटलांनी मागितली माफी

0

धुळे : जळगावमधील बोदवड नगरपंचायत प्रचारसभेत शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना डिवचताना रस्त्यांची तुलना अभिनेत्री हेमा मालिनीच्या गालांशी केली. माझ्या मतदारसंघातील रस्ते हे हेमा मालिनीच्या गालासारखे केले असल्याचं ते म्हणाले होते. यावरून गुलाबराव पाटील यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. भाजप नेत्यांनीही पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. अखेर या प्रकरणी पाटील यांनी माफी मागितली आहे.

गुलाबराव पाटलांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे भाजपकडून त्यांच्यावरती जोरदार टीका सुरु होतीच शिवाय, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर टीका करत कारवाईचा इशारा दिला होता. ‘गुलाबराव पाटील यांनी एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून गुलाबराव पाटील यांनी केलेले विधान करणे हे निषेधार्ह’ असल्याचं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं होतं. तसंच पाटील यांनी माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जावं असा इशारा देखील चाकणकर यांनी दिला होता.

काय म्हणाले होते गुलाबराव पाटील ?

“गेली 30 वर्षे एकनाथ खडसे या भागातील आमदार आहेत. पण ते चांगले रस्ते करु शकले नाहीत. माझ्या धरणगाव मतदारसंघात या आणि बघा, हेमा मालिनीच्या गालासारखे गुळगुळीत रस्ते मी केले आहेत”, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं होतं. याच पार्श्वभूमीवर राज्यात त्यांच्यावर टीका करण्यात येत होती. आज दिवसभर झालेल्या टीकेनंतर आता गुलाबराव पाटील यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असल्याचं म्हटलं आहे. तसेच भाषणातील माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर, मी दिलगिरी व्यक्त करत माफी मागतो असं गुलाबराव पाटील म्हणाले.

Leave a comment