हे माता कामाख्या देवी..सत्ता’बदला’साठी तू आशिर्वाद दिला पण आता बदल्याची भाषा थांबावी…. गुवाहाटी दौऱ्यावरून रोहित पवारांचे शिंदे गटावर टीकास्त्र

0
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज त्यांच्या सर्व समर्थक आमदारांसोबत गुवाहाटी दौऱ्यावर आहेत. तेथे कामाख्या देवीच्या दर्शनासाठी ते गेले आहेत. राज्यातील सत्तांतराच्या  इतिहासात गुवाहाटीचे स्थान केंद्रस्थानी आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार आणि खासदार आल्या कुटुंबासमवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गुवाहाटीला गेले आहेत.  मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार टीका केली आहे.
रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे कि, हे माता कामाख्या देवी..राज्यातील सामान्य माणसांच्या वतीने तुला प्रार्थना! सत्ता’बदला’साठी तू आशिर्वाद दिला पण आता बदल्याची भाषा थांबावी…. राज्याचे उद्योग गुजरातने पळवू नये..युवांच्या नोकरीचा घास हिरावला जाऊ नये..महाराष्ट्राची बदनामी सहन करू नये..वाचाळ मंत्र्यांना तारतम्य यावं, अतिवृष्टीतील बळीराजाला मदत मिळावी..राज्याची भूमी बळकावण्याची भाषा करणाऱ्यांना धडा मिळावा..अंधश्रध्दा, तंत्रमंत्र, जादूटोणा याला सरकारने बळी पडू नये..तसंच राज्याचा स्वाभिमान आणि अस्मिता अबाधित रहावी..हे अडचणींचे ‘डोंगर’ पार करण्यासाठीही जे-जे हवं ते सर्व राज्य सरकारला दे!, अशा शब्दात रोहित पवार यांनी जोरदार टीका केली आहे.
पाच महिन्यांपूर्वी राज्यात झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर राज्यात शिंदे गट आणि भाजपने सत्ता स्थापन केली. शिवसेनेत उभी फूट पडल्याने राज्यातील राजकारणात मोठा भूकंप झाला होता. शिवसेनेत बंड केल्यानंतर शिंदे गट गुवाहाटीला दाखल झाला. त्यानंतर अनेक समीकरणे बदलली. राज्यात शिंदे गट आणि भाजपची युती होऊन नवे सरकार स्थापन झाले.

Leave a comment