IPL 2022, RCB vs PBKS : लियाम लिविंगस्टोन आणि जॉनी बेअरस्टोची वादळी खेळी ; पंजाब किंग्सकडून आरसीबीचा 54 धावांनी पराभव

0

मुंबई :- आयपीएल २०२२ मधील ६० वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर पार पडला.  या सामन्यात पंजाबने बेंगलोरने ५४ धावांनी पराभूत केले आणि सामना आपल्या खिशात  घातला. हा पंजाबचा हंगामातील सहावा विजय होता. या विजयासह पंजाबने गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर  संघाने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच, पंजाब किंग्स संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. जॉने बेअरस्टो आणि शिखर धवन यांनी ताबडतोब सुरुवात दिली. पाच षटकांत पंजाबने 60 धावांचा डोंगर उभा केला होता. मॅक्सवेलने शिखर धवनला बाद करत जोडी फोडली. त्यानंतर भानुका राजपक्षे 1 धाव काढून माघारी परतला. एका बाजूला विकेट पडत असताना जॉनी बेअरस्टोची फटकेबाजी सुरुच होती. बेअरस्टोने 29 चेंडूत वादळी 66 धावांची खेळी केली. मयांक अग्रवाल याला पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयश आले. मयांक 19 धावांवर बाद झाला. जितेश शर्मा 9, हरप्रीत 7 आणि आर धवन7 झटपट बाद झाले. राहुल चाहरही दोन धावा काढून बाद झाला. बेअरस्टोनंतर अखेरला लियाम लिव्हिंगस्टोन याने वादळी फलंदाजी केली. लियामने 42 चेंडूत 70 धावांचा पाऊस पाडला. यावेळी पंजाब संघाने निर्धारित २० षटकात ९ विकेट्स गमावत २०९ धावा केल्या.

पंजाबने दिलेल्या 210 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात खराब झाली. फाफ डु प्लेसिस आणि विराट कोहली यांना चांगली सुरुवात मिळाल्यानंतर मोठी खेळी करता आली नाही. विराट कोहली 20 धावांवर बाद झाला.. तर फाफ डु प्सेसिस 10 धावा काढून माघारी परतला. त्यानंतर महिपाल सोमरोरलाही मोठी खेळी करता आली नाही. तो सहा धावा काढून माघारी परतला. मॅक्सवेल आणि रजत पाटीदार यांनी आरसीबीचा डाव सावरला.. पण ते संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. पाटीदार 26 धावा काढून बाद झाला तर मॅक्सवेल 35 धावांवर बाद झाला. दिनेश कार्तिकलाही मोठी खेळी करता आली नाही. जाबकडून गोलंदाजी करताना कागिसो रबाडा याने शानदार कामगिरी केली. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना २१ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. या विजयासह गुणतालिकेत आठव्या स्थानी असलेला पंजाब संघ २ गुणांचा फायदा घेत १२ गुणांसह सहाव्या स्थानी पोहोचला. दुसरीकडे, बेंगलोर संघ १४ गुणांसह चौथ्या स्थानी आहे.

Leave a comment